Monday, December 31, 2018

१ जानेवारी २०१९-- नवा दिवस.. नवी आशा !

पहिला दिवस...
   २०१८ लिहिता लिहिता २०१९ लिहावे लागले. थोडी गडबड होते ना...हाताला सवय व्हायलाकाही वेळ जाऊ द्यावा लागेल. आणि ते सवयीचं होता होता परत इतक्यात २०२० लिहावे लागेल..
    काळ किती पटकन सरकतो आहे... नाही का..?
    क्षण निसटून चाललाय... तरीही माणूस वाद-विवाद,हेवेदावे, द्वेष, मत्सर यातच अडकलाय..!
     मरण हे अतिंम सत्य माहीत असुनही अमरत्वाचा कमरपट्टा बांधल्यासारखा फक्त स्वार्थ साधला जातोय....प्रत्येक ठिकाणी..!
   माझं जे आहे ते फक्त माझं आहे..पण तुझंही मलाच हवं, ही लालसा वाढत चालली आहे.
    मुखवट्यांचं जगं जाऊन खरे चेहरे समोर यायला हवे.परत एकदा सत्ययुगाचा अनुभव यायला हवा... कसं असेल ते कल्पनेतलं जगं..,माणसाला माणसांची भिती वाटणार नाही.. वाईट क्रुत्य करण्यासाठी मनात वाईट विचारच येणार नाही..एकमेकांना समजून घेण्यासाठी विश्वासाला खूप महत्व असेल..दिलेली आश्वासन, शब्द पाळली जातील..भ्रष्टाचार, व्यभिचार, खोटेपणा हे शब्द च शब्दकोशातुन हद्दपार होतील.प्रत्येक नाते जपलं जाईल, सावरलं  जाईल, त्याचा आदर केला जाईल.समाजात असणारा प्रत्येक घटक निर्भयपणे जगु शकेल..
   निवडणूक ही उमेदवार च्या पैशापेक्षा सामाजिक बांधिलकी, चारीत्र्य ह्या गोष्टी वर विचार करून घेतली जाईल..गरीब- श्रीमंत ही दरीच नसेल...सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सर्वांना समान संधी असेल..
   असे काही अघटित घडणारच नाही की, आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतील ,किंवा स्रीयावंर ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलने करावी लागतील...! घडेल असं सर्व आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात.?
   माझ्या भारतात प्रांतिक, भाषिक, जातिय व धार्मिक वादच होणार नाहीत.।?
  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीप्रधान अशा माझ्या देशात बळीराजाचा बळी जाणार नाही.. त्याला हया समाज रचनेत उच्च स्थान दिले जाईल...
   जो आज समाजव्यवस्थेत मनोरा दिसतोय तो उलटा दिसायला हवा...!
   ज्या घटकांवर देशाचा कणा ताठ आहे ,ते शेतकरी, कष्टकरी, कामगार,पोलिस, सैनिक, युवा पिढी, विद्यार्थी व उपेक्षित असणारे सर्व जण जेव्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील व ते चित्र स्पष्ट होईल तेव्हा भारतातील जगं हे जगातंही आदर्श असेल.!!
   पण.. हे सर्व कधी होणार.? की कल्पनाच राहील..!
नव्या वर्षाच्या ह्या साध्यासुध्या अपेक्षा करायला काय हरकत आहे.!

   पद्मा साहेबराव....!!!

Thursday, December 27, 2018

नवीन वर्षाचे स्वागत....!

    सरत्या वर्षाने काय दिलं?  काय हिरावलं, असा हिशेब मांडायची वेळ आली. अशा  खूप घटना असतात की, त्या शब्दात जरी माडंता  नाही आल्या तरी, मनात त्यांची बेरीज वजाबाकी चालूच असते. फक्त प्रत्येक क्षणी आपल्या जवळ कागद-पेन नसतो हा त्यात फरक असतो. आणि मग जेव्हा हे कागदावर उतरवायचं ठरवतो तेव्हा बर्‍याच गोष्टी आपण विसरुन गेलेलो असतो.  
    विसरणं, ही जी मनाची अवस्था असते ना, ती मला कधी कधी खूप आधाराची  वाटते. कारण काही असे प्रसंग असतात की त्याने आपण खूप दुखावले जातो. त्यात कोणाला केलेली मदत .. किंवा आधार दिलेला असेल, वेळ निभावून नेली असेल... तर मग ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवत नाही. मग त्या व्यक्तीलाच विसरून जाणं मला फार सोपं वाटतं.
    काही काळासाठी तरी आपण हे सर्व विसरणं खूप सोयीचं असतं. फार त्रासही होत नाही.
आपल्या आयुष्यात जवळच्या व्यक्तींना झालेला त्रास, त्या अडचणीवर केलेली मात मात्र आपल्याला सुखावते.
    येथपर्यंत विसरणं आणि आठवणं, यांचे द्वंद्व सुरू असते. मनाच्या या दोन अवस्था पूर्ण आयुष्य सुंदर करून टाकतात. वाईट गोष्टींना विसरणं ही भावना मनाच्या सोबत नसती तर जीवन जगणं कंटाळवाणं झालं असतं! चांगल्या आठवणी तर आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतात.
    त्या बरोबरच मनाचे असे कप्पे करावेत की त्यात वाईट म्हणुन जो कचरा आहे, तो बाजुला करावा.. जे जे काही उत्तम असेल त्यासाठी मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवावेत.. जेणेकरून सुख वाटता आले पाहिजे.
   म्हणून नवीन वर्षात आपण ठरवू की, चांगलं सारं आठवायचं...वाईट सारे विसरायचं...कडू-गोड घटनां चा स्विकार करायचा...आणि सरत्या वर्षाचे आभार मानायचे...
     
पद्मा साहेबराव...

Sunday, November 11, 2018

जॉगिंग ट्रॅक

अनेक माणसांनी एकत्र असणे, किंवा एकाच ठिकाणी दिसणे हे साधारणपणे समाजाचं प्रतिबिंब असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, मतमतांतरे असतात.  अनेक विषयांवरील चर्चा ही असते. काहीजण फक्त या समूहाचे अवलोकन करतात. ऐकू येणाऱ्या बोलण्यातून कधी आपल्याला प्रश्न निर्माण होतात, कधी उत्तरे ही मिळतात. त्यातलच एक ठिकाण म्हणजे जॉगिंग ट्रॅक....!      
      ट्रॅक वर गेलं की मग सकाळी जॉगिंगला येणारी, रोज दिसणारी माणसे दिसायला लागली  की मग पावले पटपट पडायला लागतात.काहींचा चार-पाच जणांचा ग्रुप तर काही एकटे, असे नेहमीचे चेहरे ... त्यातही वेगवेगळ्या वयोगटाचे .,कोणी खुप वयस्कर तर  कोणी दहा-बारा वर्षाची मुले, त्यांचे वेगवेगळे विषय..     खरचं, माणसाकडे फक्त  निरीक्षण करण्याची आणि बघितलेल्या गोष्टींवर विचार करण्याची शक्ती असली म्हणजे मोठी संपत्ती आहे. हे रोजच जाणवतं.  
      मी बऱ्याच वेळा एकटीच असते.पण मला मजा येते. आजूबाजूने जाणाऱ्या माणसांच्या गप्पा ऐकण्याची इतकी सवय झाली की नेहमीच बरोबर असणाऱ्या  दोघी तिघींचा ग्रुप हा दिसला नाही तर   मलाच चुकल्यासारखे वाटते.   कारण त्या इतक्या मोठ्याने गप्पा मारतात की, ऐकणार्‍यांना त्यांच्या घरात किती माणसे, त्यांच एकमेकांशी नाते काय, त्यांचे आनंदाचे क्षण, दुःख , एवढेच काय तर, त्यांचा रोजचा दिनक्रम आम्हांला समजतो. त्यांना काही कोणाशी देणंघेणं नसतं. आणि मग तसेच दोन-तीन पुरुष त्यांच्या गप्पांमधून ते कुठे नोकरी करत असतील, कोणाला काय आर्थिक प्रॉब्लेम असेल,  कोण स्वतःहून सेवानिवृत्त होतंयं हेही समजायला लागलंय. तरुणाई च्या संभाषणात तर कॉलेज बरोबरच भविष्यातील त्यांच्या मनातील करिअर बद्दलचे महत्व हि  कळू लागले. त्यांच्या विचारांमध्ये असणारा भारत हा आशावादी वाटायला लागला.  
     काही गट मात्र समाजकारणापासून राजकारणापर्यंत देशपातळीवरील घटनांचा आढावा घेत असतात. गल्ली पासुन तर दिल्लीत काय चाललयं, याची माहिती ते   देत असतात, खरच मस्त वाटत अशा बिनधास्त माणसाना ऐकताना...!   
      काही लोक पूर्णपणे बिझनेस मॅन वाटतात. कारण त्यांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या बातम्या मला मिळतात, फरक एवढाच की, बिझनेसमेन ही जास्त करून परप्रांतीय असतात ,असे त्यांच्या भाषेवरून मी काढलेला निष्कर्ष आहे ...तो चुकिचाही असु शकतो.   
    जॉगिंग ट्रॅक  जणू काही समाज मनाचा आरसाच असतो. असे अनेक वेगळे विषय जेव्हा आपल्या कानावर पडतात, तेव्हा आपणही यातलं चांगलं काय, वाईट काय याचा विचार करायला लागतो. खरं तर त्यातील काहीअनुभव आपणही अनुभवलेले असतात. एखादी गोष्ट स्वीकारतो ती गुणदोषांसह कशी स्वीकारायला हवी, हे मनाला समजवायला लागतो. आणि मग सर्व कसं  ताजतवानं वाटतं. आपल्या बाबतीत घडलेला एखादा  प्रसंग चांगला किंवा वाईट तो मग आपण  स्वत: बरोबर शेअर करतो आणि हाच ट्रॅक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देत जातो. 
       ट्रॅक जणू काही एक शाळाच वाटायला लागते. शरीराच्या आरोग्याबरोबर मनाचेही आरोग्य सुधारते. माणसं आजमावता येतात. त्यांचे स्वभाव यांचाही अभ्यास सुरू होतो. कोण कसे असेल हे मग आपणच मनाशी संवाद करत असतो. कधी  एखाद्याची शोकांतिका असेल तर तेवढ्या क्षणाला मन  त्या अनोळखी व्यक्तीसाठी हळहळते, कोणाच्या आनंदाच्या गप्पांमधून मनाने त्यांच्यात सहभागी होऊन आनंदही होतो. असे सर्व क्षण वेचत चालत राहायचं असं आपणच आपल्याला बजावत असतो . एवढे मात्र नक्की की, जॉगिंग ट्रॅकवर चा प्रत्येक संवाद आपल्याला एक नवी ऊर्जा देतो आणि आनंदी राहण्यासाठी खूप काही किंमत मोजावी लागत नाही हेही समजतं . चला तर मग, आपण जीवनाच्या ट्रॅकवर सुखदुःखाचे  स्वागत करूया. शेवटी जीवन म्हणजे तरी कायहो,जाँगिंग ट्रॅक की...!!!

पद्मासाहेबराव..।।

Monday, October 22, 2018

#Me too चे वादळ व परिणाम

     शारदीय नवरात्र ….शक्तीचा जागर, नवचैतन्य, स्रीला शक्तीचे रूप मानल जातं. खरं आहे, कारण स्री जेवढी नाजूक, संवेदनशील, हळवी असते तीच एखाद्या कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरी जाते. जिथे पुरुषही खचून जातात...
     पण खरच, ह्या शक्तीचा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उपयोग व्हायला हवा. जिच्याकडे सृजनाची निर्मिती सोपवलीय या विधात्याने किंवा निसर्गाने म्हणा हव तर... ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर मग आज जे बाहेरचं वातावरण आहे ते तिला पोषक आहे का? ह्याचेही दोन पर्याय असतील.
      कारण सगळं काही चांगलं घडत असतांना #me too सारखे मुद्दे पुढे येतात आणि मग कोणत्या बाजूने विचार करावा, हा प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो.जर कोणत्याही  स्त्रीवर अशी परिस्थिती उद्भवली असेल तर ती तेव्हा  गप्प का राहिली?  तिच्यावर कोणाचा दबाव आला असेल का?  कारण कोणत्याही गोष्टीची एक वेळ असते. आता मेलेले  मुडदे उकरण्यात काय फायदा?
     एखादीवर असा प्रसंग आला असेल, पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेस दोघांच्या संमतीने  जर असं काही घडत असेल तरं ...नंतर त्यांच्यात झालेला वादही त्यांना #me too पर्यंत घेऊन जात असेल तरं... एखाद्या पुरुषावर सुडाच्या भावनेतून असे आरोप व्हायला लागले असतील तरं ... ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला त्या स्रियां बाजुलाच राहतील,  आणि मग हे वादळ दुसरीकडेच भरकटत जाईल ..
     दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा खुलासा तनुश्री दत्ता आज करतेय... इतके दिवस तिला विस्मरण झालं होतं का?
   नाना पाटेकर सारखा स्पष्टवक्ता असलेला माणूस जर असं काही तिच्याबाबतीत केलं असेल तर तसं सांगायला घाबरला नसता .कारण काही व्यक्तिमत्व ही अशी असतात  की, जी खणखणीत नाण्यासारखी वाजत असतात. त्यातलेच एक नाना पाटेकर आहेत असं वाटतं .
   दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी इतकं तळमळीनं काम करणारा माणूस...राकट चेहऱ्यामागे इतका हळवा माणूस...  लहान वयात वैधव्य आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरींना बघून रडणारा माणूस... असं काही  करेल  असं वाटत नाही.
     #me too  सारखं वादळ हे चक्रीवादळ ठरू पाहत आहे. समाजात असा कचरा आहे, आणि असेलही कदाचित जो महिलांच्या मजबुरीचा फायदा घेत असेल पण  त्याबरोबर  चारीत्र्यसंपन्न असणाऱ्या  पुरुषांचा कस लागू नये असंही कधी कधी वाटतं. या अशा प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा प्रत्येकीने जरा खोलवर विचार करायला हवा किंवा असं काही आपल्या बाबतीत घडलं तर मग आपण तेवढं खंबीर सक्षम बनायला हवं. त्याच वेळेस आवाज उठवायला हवा.
   आता कसं होतंय ...आपल्या समाज व्यवस्थेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण समानतेचा नारा लावतोय, ब‌ऱ्यापैकी यशही मिळालय.
    #me too सारख्या वादळामुळे पुन्हा आपल्याला घराच्या चौकटीत बंदिस्त राहावे लागेल. कारण शेवटी आपल्या कुटुंबाला आपली   जास्त् प्रमाणात  काळजी वाटेल. त्या काळजीपोटी परत आपल्यावर अनेक प्रकारची बंधने येतील ..आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक परिस्थितीत  सर्व स्त्रियांनी निदान स्वतःला सावरलं पाहिजे, सक्षम ठेवलं पाहिजे, जपलं पाहिजे. मग ते आपलं मन, विचार तसेच शरीरसुद्धा.!!

पद्मा साहेबराव....





Friday, October 5, 2018

गणपती

 गणपती  ऊत्सव ....आनंदाचा सोहळा...चैतन्य,ऊत्साह..मनावरील ताण कमी होऊन सकारात्मक बदल घडवून देणारे दिवस...।सर्व सृष्टी आनंदते. श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात..सगळी कडे हिरव्या रंगाचे गालिचेच जणू काही। या हिरवेपणा वर सूर्याचा सुवर्ण महोत्सव चालू असतो .
      बाजारात सगळीकडे गजबजाट वाढला होता. प्रत्येक दुकान गर्दीने ओसंडून वाहत होते .जिथे बाप्पाचे स्टॉल लागले होते तेथेच इतरही सामान मिळत होते. पूजा साहित्य आणि डेकोरेशनच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत होत्या.
     मी बाप्पा साठी फुलं व दुर्वा घेतल्या आणि तिथेच उभी असताना एक तरुण जोडपे पूजा साहित्य घ्यायला आले. तिने दूर्वाआहेत का? विचारलं त्या बाईने दुर्वांची किंमत सांगितली .."दहा रुपये!
ती तरूणी म्हणाली.." निवडलेल्या नाही का ?
हे बघा ताई, निवडायला वेळ नाही मिळाला, नाही तर दोन जुड्या झाल्या असत्या दूर्वांच्या !"फुलंवाली म्हणाली.तेवढ्यात ती तरुणी म्हणाली ,मावशी निवडलेल्या असत्या तर बर झालं असतं .यापेक्षा तुम्हाला दुप्पट किंमत दिली असती!
     तिचा नवरा व त्याच्याबरोबर असलेला मुलगा, बहुधा त्याचा मित्र असावा, एकमेकांकडे बघून हसायला लागले . ती तरुणी निवडलेल्या दुर्वांवर अडून राहिली होती. नवरा म्हणाला ,"घ्यायच्या तर घेऊन टाक, नाहीतर मग दुसरीकडे निवडलेल्या बघ बरं !"आणि मग त्या दूर्वा घ्याव्या की नाही, या संभ्रमात  निर्णय घ्यायला ती खूप गोंधळली होती.
      या प्रसंगाची मला खूप गंमत वाटली.कारण  तिथे थोड्याच वेळा अगोदर मीही फुलांची माळ विचारली,तर मला ती महाग वाटली.म्हणून मी फुलं घेऊन घरी च हार बनवणार होते.
मनात विचार आला...कोण बरोबर आहे...मी की ती ..?
उत्सव ,समारंभ करायचे , सण साजरे करायचे ते फक्त एक इव्हेंट म्हणूनच का ? तिला असा कितीसा वेळ लागणार होता दुर्वा निवडायला,,?
     आम्हाला सगळं इन्स्टंट हवय ,देवाची भक्ती ही पैशांपुढे कमी व्हायला लागली का ?
फक्त सेल्फी,फोटोसेशन यामध्ये सर्व सण ,समारंभ, उत्सव अडकून पडतील ,असंही वाटतं .
        सहज मनात एक विचार चमकून गेला की ,काही काळानंतर गणपतीचे स्टॉल जिथे असतील तिथे बोर्ड असतील की... येथे विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेले गणपती मिळतील आणि लोकांची तिथेच जास्त गर्दी होईल!

    पद्मा साहेबराव....

Saturday, September 22, 2018

परदेश पर्यटन -एक अनुभव

      आपल्याकडे पासपोर्ट आहे म्हणजे आपण परदेशात पर्यटन करावं ,असा माझ्यासह बहुतेकांचा समज असतो. झालं असं की माझं नवऱ्याच्या परदेशातील नोकरीमुळे सात-आठ  वर्षांपूर्वी सौदी अरेबियात जाणं झालं होतं. तेही दोनदा…! परंतु ते  कुटुंबीयांसोबत. त्याला बरेच दिवस झाले होते . पण
      माझ्या भावाची मुलगी मयुरी हाँगकाँग ला असते. तिच्या डिलिव्हरीसाठी भाऊ वहिनी तिच्याकडे तीन महिन्यासाठी  गेलेले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आम्हाला व्हाट्सअप वर पाठवत होते. ते बघुन माझ्याही मनात हाँगकाँग बघण्याचे स्वप्न साकारत होते. ती इच्छा मी घरात बोलून दाखवली , आणि मग काय... स्वप्न सत्यात उतरेल, असे मला वाटू लागले . सर्वांचा होकार...आलेली संधी घालवायची नव्हती. अट्टाहास एकच.. तुला एकटीला जावे लागेल. थोडी घाबरले होते. पण , इतका सहज आलेला होकार म्हणजे एका स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य होतं . त्याचा मला फायदा घ्यायचा होता.
       आता जाण्याची तयारी सुरू झाली. सगळे प्रोत्साहन देत होते. 22 जुलै 15 ही फ्लाईटचे बुकींग केले . प्रश्र्न एकच होता की, visa on arrival असणार होता. पंधरा दिवसांचा free visa! मयुरी मला तिकडचे नियम समजावून सांगत होती .
       माझ्या नवऱ्याचे बारा-तेरा देशात कंपनीमुळे जाणे- येणे झालेलं होतं.तेही खूप जास्त प्रमाणात अतिशय काळजी घेत सगळं काही मला समजावून सांगत होते. तोपर्यंत मला सोपे वाटत होते सगळे! जाण्याचा दिवस उजाडला तसं माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कारण मुंबई एअरपोर्ट पासून मी अगदी एकटी असणार होते . सर्वांना मी खूप खंबीर वाटत होते. पण मनातून खूप घाबरलेली होते. त्याबरोबरच मला स्वतःला सिद्ध करायचे होते, आय कॅन डू इट!! मुंबई एअरपोर्ट फ्लाईट ची वेळ स॑ध्याकाळी आठ वाजेची..  एन्ट्री केली. इमिग्रेशन ला मराठी मुलं.. एक स्टेप पार केली. परंतु घामाघूम झाले. सगळी प्रोसिजर पूर्ण करून plane मध्ये पाऊल टाकले, गड सर केला होता. पण आता पुढे काय?
   दुसऱ्या दिवशी h.k वेळेनुसार सकाळी सहा वाजता flight land होणार होती. हाँगकाँग ला ऊतरले, आणि माझ्या परीक्षेला सुरूवात झाली. साधारण पणे मला जितके ईन्ग्लिश येत होते. त्याचा तिथे काहीही उपयोग झाला नाही. मला emigretion counter मध्ये  बाजूला केले. कारण माझ्याकडे व्हिसा नव्हता. सर्व भारतीयांना वेटींग रूममध्ये पाठवले.तेथील स्टापला आपले इंग्रजी हि समजत नव्हते. मयूरी तिथे सोशल वर्कर आहे, म्हटल्यावर तिची त्यांनी पुर्णतः माहिती घेतली. जे लोक कुटुंबासह होते, त्यांना ते सोडत होते, माझ्या सारख्या एकटी व्यक्तीला थांबवत होते.
   मयुरी बाहेर वाट बघत होती. कोणाशीही  संपर्क होत नव्हता. मोबाईल बंद झाला होता. ईकडे भारतात ही सगळे घाबरले होते. असे चार तास गेले....
     मग त्या लोकांनी मयुरी शी फोनवर आमच्या नात्याची बरीच माहिती विचारली. ऊलट तपासणी केली म्हटलं तरी चालेल. आणि शेवटी . त्यांनी हसत -हसत मला welcome  केले.
आणि मी स्वतः ला सिद्ध केले.
   ह्या अनुभवातुन एक शिकले की, ह्या जगात काही ही अशक्य नाही..। जेव्हां एकटे प्रवास करतो तेव्हा आपण सुंदर अनुभव घेत असतो. हे कुठल्याही पुस्तकातुन किंवा  कोणाच्याही सोबतीने नाही शिकत..!!


पद्मा साहेबराव...

x

Saturday, September 15, 2018

पु.ल. एक विचार - (एक शून्य मी )

 

 एक  शून्य मी ह्या पुलंच्या पुस्तकातील पुढील विचार आवडला, तो असा   - "आमची दुःख समजणारा नेता आहे, असा विश्वास अनुयायांना वाटत नाही, तोपर्यंत त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. "
   खरयं, आजची राजकीय परिस्थिती बघितली की ह्या वाक्याचा अर्थ कसा लावावा हेच कळत नाही .
    पक्ष तर भारंभार आहेत ,स्वतःचाच आत्मगौरव करणारे नेतेही त्या-त्या पक्षांमध्ये आहेत. पण जनतेचा कोणावरही विश्वास नाही.
    समाजात असणारे दैनंदिन प्रश्न, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा , तरुणांना नोकऱ्या ह्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, त्याबरोबरच कोणतेही सरकार आले तरी ह्या रोजच्या जीवनातील प्रश्नांना उत्तर किंवा तोडगे निघतच नाहीत. सत्ताधीश व विरोधक यांच्यात तुम्ही काय केलं ,आम्ही काय केलं ,हे कोळसे उगाळण्यात वेळ जातो.समाजाच्या प्रश्नांकडे बघणार कोण ?             
       स्त्रियांवर होणारे अत्याचार, निरपराधांच्या हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,बंद पडत असणारे  उद्योगधंदे त्यामुळे वाढणारी  बेरोजगारी आणि त्यासंबधित  न्यायालयात प्रलंबित असणारे खटले अशा विळख्यात  सामान्य माणूस अडकलाय , आणि राजकीय स्थिती बघता असं कोणतंही नेतृत्व नाही की, ते आम्हाला आमचं वाटावं !
     एकमेकांवर ताशेरे ओढण्यात संसदेतील कार्यकाळ सपंतो .जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची  खुर्ची सांभाळण्यातच  काम काजाची वर्षे निघून जातात. तळागाळातल्या माणसांचा विकास हा  फक्त त्यांच्या निवडणूक जिंकण्यापुरता  गोंडस पण फसवा  अजेंडा असतो.
     "नेमेचि येतो पावसाळा" याप्रमाणे पुन्हा निवडणुकीच्या काळात हेच नेते साम,दाम,दंड,भेद वापरून मतदारांचा बळी घेतात. निवडून कोणीही आले तरी दुःख समजणारा नेता आम्हाला मिळत नाही. आणि दुर्दैव इतकं की, विरोधकही जनतेची बाजू मांडायला तेवढा खंबीर राहिलेला नाही .कधी असंही वाटतं की आपली लोकशाही ही  हुकूमशाहीच्या मार्गावर चालली की काय ?
       म्हणुनच राजकारणात सर्वासोबत चालणाऱ्या नेत्याची निवड व्हायला हवी..ही अस्थिर  व्यवस्था आपण  बदलु शकतो.एक सशक्त मतदार म्हणुन...
 आजच्या तरुणांकडे ,भावी पिढी घडवण्याची मोठी ताकद आहे.कारण आपला देश हा तरूणांचा देश म्हणुन आेळखला जातो..


पद्मा साहेबराव...

Sunday, September 2, 2018

पु.ल.... मला भावलेले!!!

    पु.ल.... मला भावलेले!!!

     देव व धर्म ह्या धूर्त कल्पना सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी  वापरलेल्या आहेत. हेही म्हटले तर पुन्हा पुलंचीच शब्द येतात ,आणि बरोबरही आहे, प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी शिरकाव केलेला दिसतो आणि देवाबद्दल असलेल्या श्रद्धेपेक्षा विशिष्ट लोकांच्या गटाचा तिथे प्रभाव दिसतो.
      निवडणुकीच्या वेळी या धार्मिक ,श्रद्धाळू भक्तांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्याकडे ओढले जाते. भीतीपोटी लोकही नको असलेल्या समूहांना पाठिंबा देतात. त्याबरोबरच  अधंश्रध्देची  जोड  मिळाल्यावर भोंदू तिथले संस्थानिक होतात. येणारा भक्त त्यांची प्रजा असते. हिच  प्रजा मानसिक गुलाम कधी होते हे  कळत नाही .
    गुलामगिरी स्वीकारल्यावर मग आपण  स्वतंत्रपणे विचारच करत नाही .भोंदूगिरी करणारे बुवा आणि राजकारणी जेव्हा एकत्र येतात ,तिथेच मग सौदेबाजी सुरू होते म्हणून आपण डोळसपणाने देव अनुभवावा , नाहीतर दहा-दहा हजार करोडचे आसाराम बापू कधी तयार होतात,हे भक्तांना कळेपर्यंत फार ऊशीर झालेला असतो.
      म्हणुनच देवावरची भक्ती असो, किवां राजकारणातील शक्ती, हि डोळसपणे तपासायला हवी...  कुठल्याही लाटेत वहावत जाणे..हे धोकेदायक आहे.

पद्मा साहेबराव... 


Friday, August 31, 2018

विचारमंथन

विचार मंथन-
काल,आज आणि ऊद्या ???
आज डोळ्यादेखतं अन्याय घडताहेत .धर्माच्या जोडीला प्रांत आणि भाषा रक्तपाताची कारणं होऊ घातले आहेत. आणि हे खूप खरे आहे. म्हणजे त्यांनी (पुलंनी) ज्यावेळेस हा विचार मांडला असेल ,तेव्हा आजच्यासारखीच परिस्थिती असेल का? हो ,नक्कीच! कारण, विनोदी अंगाने सर्व लिखाण करणारे पु.लं जेव्हा असा विचार मांडतात ,तेव्हा नक्कीच त्याचं गांभीर्य लक्षात  घ्यायला हवे. 
        आजही आपण समाजात वावरतो ,निरीक्षण करतो तर आपल्याला हेच दिसतं की,आज तर सोशल मीडियामुळे आपल्याला जगात काय चाललंय, ते घरात बसून समजतं .तेव्हा कुठल्याही अन्यायावर, न आवडणाऱ्या घटनांवर काही आवाज उठवला तर तेथे रक्तपात ,जाळपोळ, झुंडशाहीने होणारे हल्ले हे त्याचेच उदाहरण आहे.
       जगात सोडाच ,पण भारतात धर्म ,प्रांत ,भाषा यावरून दंगली घडत आहेत. त्या बरोबरच आणखी म्हणजे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत . हिंदुत्वाच्या नावाखाली पुरोगामी विचारांच्या व्यक्तींचीही इथे हत्या केली जाते आहे.सामान्य लोकांची सुरक्षितपणाची भावना कमी होत चालली  आहे.कोणावरही कोणाचा विश्वास राहिला नाही,इतकी आपली लोकशाही केविलवाणी झाली .

     धर्माच्या जोडीला जातीयवादाच पारडे जड होतंय .तरुण वर्गही बेरोजगार आहे. काम नसल्यामुळे त्यांचे माथी भडकवण्याचे काम हे काही राजकारण्यांकडून करून घेतलं जातंय .नोकरीच, शिक्षणाचं आमिष त्यांना दाखवले जाते .त्यात त्यांना वेगवेगळ्या जाती मध्ये विभागून आरक्षणाचे गाजर ही दाखवले जातात .आणि मग मागण्या मान्य झाल्या नाहीत ,तर हेच  तरूण रक्त झुंडशाहीने विघातक गोष्टींकडे वळत आहे.   मला असं वाटतं की, माणसाची वाटणी ही प्रांत, भाषा धर्माबरोबरच आता जाती- जातीत होऊ लागली आहे.   
       अशा सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेतला तर आपण समाजात माणूस म्हणून जगताना, हे जे मी काय करतोय.. ते बरोबर आहे की नाही, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
पद्मा साहेबराव...!