Sunday, November 24, 2019

महा-राष्ट्र कारण...की..भष्ट्रकारण...?

पक्ष्यांपेक्षा ही दैन्यावस्था राजकारण्यांची झाली आहे... म्हणजे आकाशात सहजपणे फिरणारे पक्षी तरी स्वतः ची ओळख टिकून ठेवतात पण,आजचे नेते या पक्षांतर करताना कारणे काय दाखवतात तर कार्यकर्त्यांची "इच्छा"?? मतदार संघाचा "विकास".???प्रत्येक निवडणूकीत नेत्यांच्या मागेपुढे पळणारे साधी माणसं पाहिली आणि खूप त्रास झाला... कारण हे राजकारणी सामान्य जनतेला गृहीत धरतात, आपल्याबरोबर त्यांनाही पक्षांतराची भुरळ घालतात.. मला नवल याचं वाटतं, की,विचार शक्ती च गमावून बसतो आपण...सत्तेसाठी नेते मतदारांना वेड्यात काढतात. पण मतदाराने विचार करायला हवा की आधी असलेल्या पक्षात "आपल्या" नेत्यांनी सत्ता उपभोगली असते, पदेही मिळवलेली असतात, स्वतःचा विकास केलेला असतो.. सामान्यांना काय मिळते....! त्यांच्या मागे फिरून कोणते प्रश्न सुटतात?? किती बेसिक गरजा पूर्ण होतात ? किती बेरोजगारी कमी होते?? किती शेतकऱ्यांचे प्रश्न- कामगारांचे प्रश्न, ह्याला कुठला न्याय मिळालेला असतो??? या लोकांच्या भूलथापांना बळी पडून आपण आपला विकास थांबवला आहे.. आता तर कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना सुद्धा किती हा अहंकार..! विधानसभा निवडणुका झाल्या, मी-मी म्हणणार्यांना जागा दाखवली गेली,आमचं सरकार-आपलं सरकार म्हणतांना राष्ट्रपती राजवट लागू होते..व्वा.. किती दुर्दैव..! पण आता मतदार राजा सुज्ञ झाला आह बऱं का.. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांना पावसाने झोडपले, करोडोंचे नुकसान झाले.. आणि प्रत्येक राजकारणी हा बांधां-बांधांवर जाऊ लागला फक्त फोटोसेशन झालं..बाकी कार्यवाही फार काहीच नाही... इकडे सत्तेची गणितं सोडवणं चालूच आहे.. बळीराजाच काय, पण प्रत्येक मतदाराला फसवलं जातंय... शेतकर्यांसारखेच प्रश्न कामगारांचे पण आहेत.. कंपन्या बंद पडल्या, कामगारांचे कुटुंब उध्वस्त व्हायला लागले, विद्यार्थ्यांना पदवीधर असूनही नोकरी मिळत नाही की बिझनेससाठी आर्थिक परिस्थिती नाही.. राजकारण्यांनो, एवढाच महाराष्ट्राचा कळवळा असेल ना, तर इतके दिवस आमच्या पैशांवर- मतांवर सत्तेत राहून केलेले घोटाळे, कमावलेली गडगंज संपत्ती द्या ना समाजाला मोकळी करून... सात पिढ्यांना पुरेल एवढं मिळवलेले उत्पन्न द्या या समाजात वाटून, जिथे माणसांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे!.. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारची गरज नाही.कुठलेही ऊत्पन्नाचे साधन नसतानाही ह्यांच्या मुलांच्या नावावर करोडोंच्या मिळकती, आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पण, आता जे घडतं आहे ते बरं होईल.. हे त्रिशंकू सरकार निदाान काम करताना एकमेकांना विचारून, एकमेकांच्या दबावाने निर्णय घेतील.. बहुमत जर एकाच पक्षाला असतं तर ती वाटचाल हुकूमशाहीकडे होत होती, आता मात्र प्रत्येक पक्षाचा विचार घेतला जाईल त्यातून काही चांगले घडावे हीच "इच्छा"....! वरच्या लिखाणाला "पूर्णविराम" दिला नाही, तोच बातमी कानावर आली की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस बरोबर रात्रीतून सरकार स्थापन केल.???? किती "गलिच्छ" राजकारण.. पुढे जाऊन तर मी म्हणेन की हा "सामाजिक व्यभिचार" आहे... किती फसवणूक ही जनतेची??? कुठल्या पातळीवर जावं याला काही मर्यादा असाव्यात.. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही , या राजकारण्यांनी स्थिर सरकार स्थापन करण्या पेक्षाही वैयक्तिक गोळा केलेली "माया" जरी बाहेर काढली, तिजोरी खुली करून ईतिहास घडवावा.. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ...तेव्हाच यांना शाहू, फुले व आंबेडकराचे नाव घेण्याचा अधिकार आहे..।।यात काडीमात्र ही शंका नाही..!!!!!
पद्मा साहेबराव..।।

Friday, August 9, 2019

तांडव...!

तांडव..।।। देतोस सहश्र हाताने, तुला ग्रुहीतच धरत असतो, देता-देता घेऊन जातोस , आम्ही हतबल होतो ! पाणी म्हणजे जीवन होतं, पाणी म्हणजे मरण हेही दाखवून दिलं, गुरं-ढोरं बायका पोरं, सारंच वाहुन गेलं! नदी-नाले सोडून तू रस्त्यावर येतो , आमचेच काही चुकते का, अतिक्रमण करून, तुलाच बोलावून घेतो! इतका कोपलास तू ,घरा-दारात आलास, संसार सुखाचा तु,वाहवत नेला! इतका प्रेमळ कधी तू ,पानाफुलात वावरतो, तांडव तुझे बघुन आज,माणूस माणसाला सावरतो! तुझ्या रौद्र रूपाने मात्र,हे दाखवून दिलें, धर्म ,जात ,पंथ हे वाहतच गेलें, मदतीला फक्त हात कामास आले! देव तु की ,देव हा कळेनासं झांल, वाचवणार्या पायानांच मी देवपण दिलं! देवळातल्या देवा तु दिसला नाहीं कधी, तुझचं रुप घेऊन ते जवान आले आधी! आता जन्म मरणाच राजकारण होईल तुझ्या न्यायालयाचा निर्णय, श्रेय घेण्याचं राजकारण उफाळुन येईल....! @ पद्मासाहेबराव... नाशिक

Monday, December 31, 2018

१ जानेवारी २०१९-- नवा दिवस.. नवी आशा !

पहिला दिवस...
   २०१८ लिहिता लिहिता २०१९ लिहावे लागले. थोडी गडबड होते ना...हाताला सवय व्हायलाकाही वेळ जाऊ द्यावा लागेल. आणि ते सवयीचं होता होता परत इतक्यात २०२० लिहावे लागेल..
    काळ किती पटकन सरकतो आहे... नाही का..?
    क्षण निसटून चाललाय... तरीही माणूस वाद-विवाद,हेवेदावे, द्वेष, मत्सर यातच अडकलाय..!
     मरण हे अतिंम सत्य माहीत असुनही अमरत्वाचा कमरपट्टा बांधल्यासारखा फक्त स्वार्थ साधला जातोय....प्रत्येक ठिकाणी..!
   माझं जे आहे ते फक्त माझं आहे..पण तुझंही मलाच हवं, ही लालसा वाढत चालली आहे.
    मुखवट्यांचं जगं जाऊन खरे चेहरे समोर यायला हवे.परत एकदा सत्ययुगाचा अनुभव यायला हवा... कसं असेल ते कल्पनेतलं जगं..,माणसाला माणसांची भिती वाटणार नाही.. वाईट क्रुत्य करण्यासाठी मनात वाईट विचारच येणार नाही..एकमेकांना समजून घेण्यासाठी विश्वासाला खूप महत्व असेल..दिलेली आश्वासन, शब्द पाळली जातील..भ्रष्टाचार, व्यभिचार, खोटेपणा हे शब्द च शब्दकोशातुन हद्दपार होतील.प्रत्येक नाते जपलं जाईल, सावरलं  जाईल, त्याचा आदर केला जाईल.समाजात असणारा प्रत्येक घटक निर्भयपणे जगु शकेल..
   निवडणूक ही उमेदवार च्या पैशापेक्षा सामाजिक बांधिलकी, चारीत्र्य ह्या गोष्टी वर विचार करून घेतली जाईल..गरीब- श्रीमंत ही दरीच नसेल...सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सर्वांना समान संधी असेल..
   असे काही अघटित घडणारच नाही की, आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतील ,किंवा स्रीयावंर ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलने करावी लागतील...! घडेल असं सर्व आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात.?
   माझ्या भारतात प्रांतिक, भाषिक, जातिय व धार्मिक वादच होणार नाहीत.।?
  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीप्रधान अशा माझ्या देशात बळीराजाचा बळी जाणार नाही.. त्याला हया समाज रचनेत उच्च स्थान दिले जाईल...
   जो आज समाजव्यवस्थेत मनोरा दिसतोय तो उलटा दिसायला हवा...!
   ज्या घटकांवर देशाचा कणा ताठ आहे ,ते शेतकरी, कष्टकरी, कामगार,पोलिस, सैनिक, युवा पिढी, विद्यार्थी व उपेक्षित असणारे सर्व जण जेव्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील व ते चित्र स्पष्ट होईल तेव्हा भारतातील जगं हे जगातंही आदर्श असेल.!!
   पण.. हे सर्व कधी होणार.? की कल्पनाच राहील..!
नव्या वर्षाच्या ह्या साध्यासुध्या अपेक्षा करायला काय हरकत आहे.!

   पद्मा साहेबराव....!!!

Thursday, December 27, 2018

नवीन वर्षाचे स्वागत....!

    सरत्या वर्षाने काय दिलं?  काय हिरावलं, असा हिशेब मांडायची वेळ आली. अशा  खूप घटना असतात की, त्या शब्दात जरी माडंता  नाही आल्या तरी, मनात त्यांची बेरीज वजाबाकी चालूच असते. फक्त प्रत्येक क्षणी आपल्या जवळ कागद-पेन नसतो हा त्यात फरक असतो. आणि मग जेव्हा हे कागदावर उतरवायचं ठरवतो तेव्हा बर्‍याच गोष्टी आपण विसरुन गेलेलो असतो.  
    विसरणं, ही जी मनाची अवस्था असते ना, ती मला कधी कधी खूप आधाराची  वाटते. कारण काही असे प्रसंग असतात की त्याने आपण खूप दुखावले जातो. त्यात कोणाला केलेली मदत .. किंवा आधार दिलेला असेल, वेळ निभावून नेली असेल... तर मग ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवत नाही. मग त्या व्यक्तीलाच विसरून जाणं मला फार सोपं वाटतं.
    काही काळासाठी तरी आपण हे सर्व विसरणं खूप सोयीचं असतं. फार त्रासही होत नाही.
आपल्या आयुष्यात जवळच्या व्यक्तींना झालेला त्रास, त्या अडचणीवर केलेली मात मात्र आपल्याला सुखावते.
    येथपर्यंत विसरणं आणि आठवणं, यांचे द्वंद्व सुरू असते. मनाच्या या दोन अवस्था पूर्ण आयुष्य सुंदर करून टाकतात. वाईट गोष्टींना विसरणं ही भावना मनाच्या सोबत नसती तर जीवन जगणं कंटाळवाणं झालं असतं! चांगल्या आठवणी तर आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतात.
    त्या बरोबरच मनाचे असे कप्पे करावेत की त्यात वाईट म्हणुन जो कचरा आहे, तो बाजुला करावा.. जे जे काही उत्तम असेल त्यासाठी मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवावेत.. जेणेकरून सुख वाटता आले पाहिजे.
   म्हणून नवीन वर्षात आपण ठरवू की, चांगलं सारं आठवायचं...वाईट सारे विसरायचं...कडू-गोड घटनां चा स्विकार करायचा...आणि सरत्या वर्षाचे आभार मानायचे...
     
पद्मा साहेबराव...

Sunday, November 11, 2018

जॉगिंग ट्रॅक

अनेक माणसांनी एकत्र असणे, किंवा एकाच ठिकाणी दिसणे हे साधारणपणे समाजाचं प्रतिबिंब असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, मतमतांतरे असतात.  अनेक विषयांवरील चर्चा ही असते. काहीजण फक्त या समूहाचे अवलोकन करतात. ऐकू येणाऱ्या बोलण्यातून कधी आपल्याला प्रश्न निर्माण होतात, कधी उत्तरे ही मिळतात. त्यातलच एक ठिकाण म्हणजे जॉगिंग ट्रॅक....!      
      ट्रॅक वर गेलं की मग सकाळी जॉगिंगला येणारी, रोज दिसणारी माणसे दिसायला लागली  की मग पावले पटपट पडायला लागतात.काहींचा चार-पाच जणांचा ग्रुप तर काही एकटे, असे नेहमीचे चेहरे ... त्यातही वेगवेगळ्या वयोगटाचे .,कोणी खुप वयस्कर तर  कोणी दहा-बारा वर्षाची मुले, त्यांचे वेगवेगळे विषय..     खरचं, माणसाकडे फक्त  निरीक्षण करण्याची आणि बघितलेल्या गोष्टींवर विचार करण्याची शक्ती असली म्हणजे मोठी संपत्ती आहे. हे रोजच जाणवतं.  
      मी बऱ्याच वेळा एकटीच असते.पण मला मजा येते. आजूबाजूने जाणाऱ्या माणसांच्या गप्पा ऐकण्याची इतकी सवय झाली की नेहमीच बरोबर असणाऱ्या  दोघी तिघींचा ग्रुप हा दिसला नाही तर   मलाच चुकल्यासारखे वाटते.   कारण त्या इतक्या मोठ्याने गप्पा मारतात की, ऐकणार्‍यांना त्यांच्या घरात किती माणसे, त्यांच एकमेकांशी नाते काय, त्यांचे आनंदाचे क्षण, दुःख , एवढेच काय तर, त्यांचा रोजचा दिनक्रम आम्हांला समजतो. त्यांना काही कोणाशी देणंघेणं नसतं. आणि मग तसेच दोन-तीन पुरुष त्यांच्या गप्पांमधून ते कुठे नोकरी करत असतील, कोणाला काय आर्थिक प्रॉब्लेम असेल,  कोण स्वतःहून सेवानिवृत्त होतंयं हेही समजायला लागलंय. तरुणाई च्या संभाषणात तर कॉलेज बरोबरच भविष्यातील त्यांच्या मनातील करिअर बद्दलचे महत्व हि  कळू लागले. त्यांच्या विचारांमध्ये असणारा भारत हा आशावादी वाटायला लागला.  
     काही गट मात्र समाजकारणापासून राजकारणापर्यंत देशपातळीवरील घटनांचा आढावा घेत असतात. गल्ली पासुन तर दिल्लीत काय चाललयं, याची माहिती ते   देत असतात, खरच मस्त वाटत अशा बिनधास्त माणसाना ऐकताना...!   
      काही लोक पूर्णपणे बिझनेस मॅन वाटतात. कारण त्यांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या बातम्या मला मिळतात, फरक एवढाच की, बिझनेसमेन ही जास्त करून परप्रांतीय असतात ,असे त्यांच्या भाषेवरून मी काढलेला निष्कर्ष आहे ...तो चुकिचाही असु शकतो.   
    जॉगिंग ट्रॅक  जणू काही समाज मनाचा आरसाच असतो. असे अनेक वेगळे विषय जेव्हा आपल्या कानावर पडतात, तेव्हा आपणही यातलं चांगलं काय, वाईट काय याचा विचार करायला लागतो. खरं तर त्यातील काहीअनुभव आपणही अनुभवलेले असतात. एखादी गोष्ट स्वीकारतो ती गुणदोषांसह कशी स्वीकारायला हवी, हे मनाला समजवायला लागतो. आणि मग सर्व कसं  ताजतवानं वाटतं. आपल्या बाबतीत घडलेला एखादा  प्रसंग चांगला किंवा वाईट तो मग आपण  स्वत: बरोबर शेअर करतो आणि हाच ट्रॅक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देत जातो. 
       ट्रॅक जणू काही एक शाळाच वाटायला लागते. शरीराच्या आरोग्याबरोबर मनाचेही आरोग्य सुधारते. माणसं आजमावता येतात. त्यांचे स्वभाव यांचाही अभ्यास सुरू होतो. कोण कसे असेल हे मग आपणच मनाशी संवाद करत असतो. कधी  एखाद्याची शोकांतिका असेल तर तेवढ्या क्षणाला मन  त्या अनोळखी व्यक्तीसाठी हळहळते, कोणाच्या आनंदाच्या गप्पांमधून मनाने त्यांच्यात सहभागी होऊन आनंदही होतो. असे सर्व क्षण वेचत चालत राहायचं असं आपणच आपल्याला बजावत असतो . एवढे मात्र नक्की की, जॉगिंग ट्रॅकवर चा प्रत्येक संवाद आपल्याला एक नवी ऊर्जा देतो आणि आनंदी राहण्यासाठी खूप काही किंमत मोजावी लागत नाही हेही समजतं . चला तर मग, आपण जीवनाच्या ट्रॅकवर सुखदुःखाचे  स्वागत करूया. शेवटी जीवन म्हणजे तरी कायहो,जाँगिंग ट्रॅक की...!!!

पद्मासाहेबराव..।।

Monday, October 22, 2018

#Me too चे वादळ व परिणाम

     शारदीय नवरात्र ….शक्तीचा जागर, नवचैतन्य, स्रीला शक्तीचे रूप मानल जातं. खरं आहे, कारण स्री जेवढी नाजूक, संवेदनशील, हळवी असते तीच एखाद्या कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरी जाते. जिथे पुरुषही खचून जातात...
     पण खरच, ह्या शक्तीचा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उपयोग व्हायला हवा. जिच्याकडे सृजनाची निर्मिती सोपवलीय या विधात्याने किंवा निसर्गाने म्हणा हव तर... ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर मग आज जे बाहेरचं वातावरण आहे ते तिला पोषक आहे का? ह्याचेही दोन पर्याय असतील.
      कारण सगळं काही चांगलं घडत असतांना #me too सारखे मुद्दे पुढे येतात आणि मग कोणत्या बाजूने विचार करावा, हा प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो.जर कोणत्याही  स्त्रीवर अशी परिस्थिती उद्भवली असेल तर ती तेव्हा  गप्प का राहिली?  तिच्यावर कोणाचा दबाव आला असेल का?  कारण कोणत्याही गोष्टीची एक वेळ असते. आता मेलेले  मुडदे उकरण्यात काय फायदा?
     एखादीवर असा प्रसंग आला असेल, पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेस दोघांच्या संमतीने  जर असं काही घडत असेल तरं ...नंतर त्यांच्यात झालेला वादही त्यांना #me too पर्यंत घेऊन जात असेल तरं... एखाद्या पुरुषावर सुडाच्या भावनेतून असे आरोप व्हायला लागले असतील तरं ... ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला त्या स्रियां बाजुलाच राहतील,  आणि मग हे वादळ दुसरीकडेच भरकटत जाईल ..
     दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा खुलासा तनुश्री दत्ता आज करतेय... इतके दिवस तिला विस्मरण झालं होतं का?
   नाना पाटेकर सारखा स्पष्टवक्ता असलेला माणूस जर असं काही तिच्याबाबतीत केलं असेल तर तसं सांगायला घाबरला नसता .कारण काही व्यक्तिमत्व ही अशी असतात  की, जी खणखणीत नाण्यासारखी वाजत असतात. त्यातलेच एक नाना पाटेकर आहेत असं वाटतं .
   दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी इतकं तळमळीनं काम करणारा माणूस...राकट चेहऱ्यामागे इतका हळवा माणूस...  लहान वयात वैधव्य आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरींना बघून रडणारा माणूस... असं काही  करेल  असं वाटत नाही.
     #me too  सारखं वादळ हे चक्रीवादळ ठरू पाहत आहे. समाजात असा कचरा आहे, आणि असेलही कदाचित जो महिलांच्या मजबुरीचा फायदा घेत असेल पण  त्याबरोबर  चारीत्र्यसंपन्न असणाऱ्या  पुरुषांचा कस लागू नये असंही कधी कधी वाटतं. या अशा प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा प्रत्येकीने जरा खोलवर विचार करायला हवा किंवा असं काही आपल्या बाबतीत घडलं तर मग आपण तेवढं खंबीर सक्षम बनायला हवं. त्याच वेळेस आवाज उठवायला हवा.
   आता कसं होतंय ...आपल्या समाज व्यवस्थेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण समानतेचा नारा लावतोय, ब‌ऱ्यापैकी यशही मिळालय.
    #me too सारख्या वादळामुळे पुन्हा आपल्याला घराच्या चौकटीत बंदिस्त राहावे लागेल. कारण शेवटी आपल्या कुटुंबाला आपली   जास्त् प्रमाणात  काळजी वाटेल. त्या काळजीपोटी परत आपल्यावर अनेक प्रकारची बंधने येतील ..आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक परिस्थितीत  सर्व स्त्रियांनी निदान स्वतःला सावरलं पाहिजे, सक्षम ठेवलं पाहिजे, जपलं पाहिजे. मग ते आपलं मन, विचार तसेच शरीरसुद्धा.!!

पद्मा साहेबराव....





Friday, October 5, 2018

गणपती

 गणपती  ऊत्सव ....आनंदाचा सोहळा...चैतन्य,ऊत्साह..मनावरील ताण कमी होऊन सकारात्मक बदल घडवून देणारे दिवस...।सर्व सृष्टी आनंदते. श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात..सगळी कडे हिरव्या रंगाचे गालिचेच जणू काही। या हिरवेपणा वर सूर्याचा सुवर्ण महोत्सव चालू असतो .
      बाजारात सगळीकडे गजबजाट वाढला होता. प्रत्येक दुकान गर्दीने ओसंडून वाहत होते .जिथे बाप्पाचे स्टॉल लागले होते तेथेच इतरही सामान मिळत होते. पूजा साहित्य आणि डेकोरेशनच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत होत्या.
     मी बाप्पा साठी फुलं व दुर्वा घेतल्या आणि तिथेच उभी असताना एक तरुण जोडपे पूजा साहित्य घ्यायला आले. तिने दूर्वाआहेत का? विचारलं त्या बाईने दुर्वांची किंमत सांगितली .."दहा रुपये!
ती तरूणी म्हणाली.." निवडलेल्या नाही का ?
हे बघा ताई, निवडायला वेळ नाही मिळाला, नाही तर दोन जुड्या झाल्या असत्या दूर्वांच्या !"फुलंवाली म्हणाली.तेवढ्यात ती तरुणी म्हणाली ,मावशी निवडलेल्या असत्या तर बर झालं असतं .यापेक्षा तुम्हाला दुप्पट किंमत दिली असती!
     तिचा नवरा व त्याच्याबरोबर असलेला मुलगा, बहुधा त्याचा मित्र असावा, एकमेकांकडे बघून हसायला लागले . ती तरुणी निवडलेल्या दुर्वांवर अडून राहिली होती. नवरा म्हणाला ,"घ्यायच्या तर घेऊन टाक, नाहीतर मग दुसरीकडे निवडलेल्या बघ बरं !"आणि मग त्या दूर्वा घ्याव्या की नाही, या संभ्रमात  निर्णय घ्यायला ती खूप गोंधळली होती.
      या प्रसंगाची मला खूप गंमत वाटली.कारण  तिथे थोड्याच वेळा अगोदर मीही फुलांची माळ विचारली,तर मला ती महाग वाटली.म्हणून मी फुलं घेऊन घरी च हार बनवणार होते.
मनात विचार आला...कोण बरोबर आहे...मी की ती ..?
उत्सव ,समारंभ करायचे , सण साजरे करायचे ते फक्त एक इव्हेंट म्हणूनच का ? तिला असा कितीसा वेळ लागणार होता दुर्वा निवडायला,,?
     आम्हाला सगळं इन्स्टंट हवय ,देवाची भक्ती ही पैशांपुढे कमी व्हायला लागली का ?
फक्त सेल्फी,फोटोसेशन यामध्ये सर्व सण ,समारंभ, उत्सव अडकून पडतील ,असंही वाटतं .
        सहज मनात एक विचार चमकून गेला की ,काही काळानंतर गणपतीचे स्टॉल जिथे असतील तिथे बोर्ड असतील की... येथे विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेले गणपती मिळतील आणि लोकांची तिथेच जास्त गर्दी होईल!

    पद्मा साहेबराव....