Monday, October 22, 2018

#Me too चे वादळ व परिणाम

     शारदीय नवरात्र ….शक्तीचा जागर, नवचैतन्य, स्रीला शक्तीचे रूप मानल जातं. खरं आहे, कारण स्री जेवढी नाजूक, संवेदनशील, हळवी असते तीच एखाद्या कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरी जाते. जिथे पुरुषही खचून जातात...
     पण खरच, ह्या शक्तीचा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उपयोग व्हायला हवा. जिच्याकडे सृजनाची निर्मिती सोपवलीय या विधात्याने किंवा निसर्गाने म्हणा हव तर... ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर मग आज जे बाहेरचं वातावरण आहे ते तिला पोषक आहे का? ह्याचेही दोन पर्याय असतील.
      कारण सगळं काही चांगलं घडत असतांना #me too सारखे मुद्दे पुढे येतात आणि मग कोणत्या बाजूने विचार करावा, हा प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो.जर कोणत्याही  स्त्रीवर अशी परिस्थिती उद्भवली असेल तर ती तेव्हा  गप्प का राहिली?  तिच्यावर कोणाचा दबाव आला असेल का?  कारण कोणत्याही गोष्टीची एक वेळ असते. आता मेलेले  मुडदे उकरण्यात काय फायदा?
     एखादीवर असा प्रसंग आला असेल, पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेस दोघांच्या संमतीने  जर असं काही घडत असेल तरं ...नंतर त्यांच्यात झालेला वादही त्यांना #me too पर्यंत घेऊन जात असेल तरं... एखाद्या पुरुषावर सुडाच्या भावनेतून असे आरोप व्हायला लागले असतील तरं ... ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला त्या स्रियां बाजुलाच राहतील,  आणि मग हे वादळ दुसरीकडेच भरकटत जाईल ..
     दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा खुलासा तनुश्री दत्ता आज करतेय... इतके दिवस तिला विस्मरण झालं होतं का?
   नाना पाटेकर सारखा स्पष्टवक्ता असलेला माणूस जर असं काही तिच्याबाबतीत केलं असेल तर तसं सांगायला घाबरला नसता .कारण काही व्यक्तिमत्व ही अशी असतात  की, जी खणखणीत नाण्यासारखी वाजत असतात. त्यातलेच एक नाना पाटेकर आहेत असं वाटतं .
   दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी इतकं तळमळीनं काम करणारा माणूस...राकट चेहऱ्यामागे इतका हळवा माणूस...  लहान वयात वैधव्य आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरींना बघून रडणारा माणूस... असं काही  करेल  असं वाटत नाही.
     #me too  सारखं वादळ हे चक्रीवादळ ठरू पाहत आहे. समाजात असा कचरा आहे, आणि असेलही कदाचित जो महिलांच्या मजबुरीचा फायदा घेत असेल पण  त्याबरोबर  चारीत्र्यसंपन्न असणाऱ्या  पुरुषांचा कस लागू नये असंही कधी कधी वाटतं. या अशा प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा प्रत्येकीने जरा खोलवर विचार करायला हवा किंवा असं काही आपल्या बाबतीत घडलं तर मग आपण तेवढं खंबीर सक्षम बनायला हवं. त्याच वेळेस आवाज उठवायला हवा.
   आता कसं होतंय ...आपल्या समाज व्यवस्थेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण समानतेचा नारा लावतोय, ब‌ऱ्यापैकी यशही मिळालय.
    #me too सारख्या वादळामुळे पुन्हा आपल्याला घराच्या चौकटीत बंदिस्त राहावे लागेल. कारण शेवटी आपल्या कुटुंबाला आपली   जास्त् प्रमाणात  काळजी वाटेल. त्या काळजीपोटी परत आपल्यावर अनेक प्रकारची बंधने येतील ..आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक परिस्थितीत  सर्व स्त्रियांनी निदान स्वतःला सावरलं पाहिजे, सक्षम ठेवलं पाहिजे, जपलं पाहिजे. मग ते आपलं मन, विचार तसेच शरीरसुद्धा.!!

पद्मा साहेबराव....





Friday, October 5, 2018

गणपती

 गणपती  ऊत्सव ....आनंदाचा सोहळा...चैतन्य,ऊत्साह..मनावरील ताण कमी होऊन सकारात्मक बदल घडवून देणारे दिवस...।सर्व सृष्टी आनंदते. श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात..सगळी कडे हिरव्या रंगाचे गालिचेच जणू काही। या हिरवेपणा वर सूर्याचा सुवर्ण महोत्सव चालू असतो .
      बाजारात सगळीकडे गजबजाट वाढला होता. प्रत्येक दुकान गर्दीने ओसंडून वाहत होते .जिथे बाप्पाचे स्टॉल लागले होते तेथेच इतरही सामान मिळत होते. पूजा साहित्य आणि डेकोरेशनच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत होत्या.
     मी बाप्पा साठी फुलं व दुर्वा घेतल्या आणि तिथेच उभी असताना एक तरुण जोडपे पूजा साहित्य घ्यायला आले. तिने दूर्वाआहेत का? विचारलं त्या बाईने दुर्वांची किंमत सांगितली .."दहा रुपये!
ती तरूणी म्हणाली.." निवडलेल्या नाही का ?
हे बघा ताई, निवडायला वेळ नाही मिळाला, नाही तर दोन जुड्या झाल्या असत्या दूर्वांच्या !"फुलंवाली म्हणाली.तेवढ्यात ती तरुणी म्हणाली ,मावशी निवडलेल्या असत्या तर बर झालं असतं .यापेक्षा तुम्हाला दुप्पट किंमत दिली असती!
     तिचा नवरा व त्याच्याबरोबर असलेला मुलगा, बहुधा त्याचा मित्र असावा, एकमेकांकडे बघून हसायला लागले . ती तरुणी निवडलेल्या दुर्वांवर अडून राहिली होती. नवरा म्हणाला ,"घ्यायच्या तर घेऊन टाक, नाहीतर मग दुसरीकडे निवडलेल्या बघ बरं !"आणि मग त्या दूर्वा घ्याव्या की नाही, या संभ्रमात  निर्णय घ्यायला ती खूप गोंधळली होती.
      या प्रसंगाची मला खूप गंमत वाटली.कारण  तिथे थोड्याच वेळा अगोदर मीही फुलांची माळ विचारली,तर मला ती महाग वाटली.म्हणून मी फुलं घेऊन घरी च हार बनवणार होते.
मनात विचार आला...कोण बरोबर आहे...मी की ती ..?
उत्सव ,समारंभ करायचे , सण साजरे करायचे ते फक्त एक इव्हेंट म्हणूनच का ? तिला असा कितीसा वेळ लागणार होता दुर्वा निवडायला,,?
     आम्हाला सगळं इन्स्टंट हवय ,देवाची भक्ती ही पैशांपुढे कमी व्हायला लागली का ?
फक्त सेल्फी,फोटोसेशन यामध्ये सर्व सण ,समारंभ, उत्सव अडकून पडतील ,असंही वाटतं .
        सहज मनात एक विचार चमकून गेला की ,काही काळानंतर गणपतीचे स्टॉल जिथे असतील तिथे बोर्ड असतील की... येथे विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेले गणपती मिळतील आणि लोकांची तिथेच जास्त गर्दी होईल!

    पद्मा साहेबराव....