Thursday, December 27, 2018

नवीन वर्षाचे स्वागत....!

    सरत्या वर्षाने काय दिलं?  काय हिरावलं, असा हिशेब मांडायची वेळ आली. अशा  खूप घटना असतात की, त्या शब्दात जरी माडंता  नाही आल्या तरी, मनात त्यांची बेरीज वजाबाकी चालूच असते. फक्त प्रत्येक क्षणी आपल्या जवळ कागद-पेन नसतो हा त्यात फरक असतो. आणि मग जेव्हा हे कागदावर उतरवायचं ठरवतो तेव्हा बर्‍याच गोष्टी आपण विसरुन गेलेलो असतो.  
    विसरणं, ही जी मनाची अवस्था असते ना, ती मला कधी कधी खूप आधाराची  वाटते. कारण काही असे प्रसंग असतात की त्याने आपण खूप दुखावले जातो. त्यात कोणाला केलेली मदत .. किंवा आधार दिलेला असेल, वेळ निभावून नेली असेल... तर मग ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवत नाही. मग त्या व्यक्तीलाच विसरून जाणं मला फार सोपं वाटतं.
    काही काळासाठी तरी आपण हे सर्व विसरणं खूप सोयीचं असतं. फार त्रासही होत नाही.
आपल्या आयुष्यात जवळच्या व्यक्तींना झालेला त्रास, त्या अडचणीवर केलेली मात मात्र आपल्याला सुखावते.
    येथपर्यंत विसरणं आणि आठवणं, यांचे द्वंद्व सुरू असते. मनाच्या या दोन अवस्था पूर्ण आयुष्य सुंदर करून टाकतात. वाईट गोष्टींना विसरणं ही भावना मनाच्या सोबत नसती तर जीवन जगणं कंटाळवाणं झालं असतं! चांगल्या आठवणी तर आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतात.
    त्या बरोबरच मनाचे असे कप्पे करावेत की त्यात वाईट म्हणुन जो कचरा आहे, तो बाजुला करावा.. जे जे काही उत्तम असेल त्यासाठी मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवावेत.. जेणेकरून सुख वाटता आले पाहिजे.
   म्हणून नवीन वर्षात आपण ठरवू की, चांगलं सारं आठवायचं...वाईट सारे विसरायचं...कडू-गोड घटनां चा स्विकार करायचा...आणि सरत्या वर्षाचे आभार मानायचे...
     
पद्मा साहेबराव...

No comments:

Post a Comment