Sunday, November 11, 2018

जॉगिंग ट्रॅक

अनेक माणसांनी एकत्र असणे, किंवा एकाच ठिकाणी दिसणे हे साधारणपणे समाजाचं प्रतिबिंब असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, मतमतांतरे असतात.  अनेक विषयांवरील चर्चा ही असते. काहीजण फक्त या समूहाचे अवलोकन करतात. ऐकू येणाऱ्या बोलण्यातून कधी आपल्याला प्रश्न निर्माण होतात, कधी उत्तरे ही मिळतात. त्यातलच एक ठिकाण म्हणजे जॉगिंग ट्रॅक....!      
      ट्रॅक वर गेलं की मग सकाळी जॉगिंगला येणारी, रोज दिसणारी माणसे दिसायला लागली  की मग पावले पटपट पडायला लागतात.काहींचा चार-पाच जणांचा ग्रुप तर काही एकटे, असे नेहमीचे चेहरे ... त्यातही वेगवेगळ्या वयोगटाचे .,कोणी खुप वयस्कर तर  कोणी दहा-बारा वर्षाची मुले, त्यांचे वेगवेगळे विषय..     खरचं, माणसाकडे फक्त  निरीक्षण करण्याची आणि बघितलेल्या गोष्टींवर विचार करण्याची शक्ती असली म्हणजे मोठी संपत्ती आहे. हे रोजच जाणवतं.  
      मी बऱ्याच वेळा एकटीच असते.पण मला मजा येते. आजूबाजूने जाणाऱ्या माणसांच्या गप्पा ऐकण्याची इतकी सवय झाली की नेहमीच बरोबर असणाऱ्या  दोघी तिघींचा ग्रुप हा दिसला नाही तर   मलाच चुकल्यासारखे वाटते.   कारण त्या इतक्या मोठ्याने गप्पा मारतात की, ऐकणार्‍यांना त्यांच्या घरात किती माणसे, त्यांच एकमेकांशी नाते काय, त्यांचे आनंदाचे क्षण, दुःख , एवढेच काय तर, त्यांचा रोजचा दिनक्रम आम्हांला समजतो. त्यांना काही कोणाशी देणंघेणं नसतं. आणि मग तसेच दोन-तीन पुरुष त्यांच्या गप्पांमधून ते कुठे नोकरी करत असतील, कोणाला काय आर्थिक प्रॉब्लेम असेल,  कोण स्वतःहून सेवानिवृत्त होतंयं हेही समजायला लागलंय. तरुणाई च्या संभाषणात तर कॉलेज बरोबरच भविष्यातील त्यांच्या मनातील करिअर बद्दलचे महत्व हि  कळू लागले. त्यांच्या विचारांमध्ये असणारा भारत हा आशावादी वाटायला लागला.  
     काही गट मात्र समाजकारणापासून राजकारणापर्यंत देशपातळीवरील घटनांचा आढावा घेत असतात. गल्ली पासुन तर दिल्लीत काय चाललयं, याची माहिती ते   देत असतात, खरच मस्त वाटत अशा बिनधास्त माणसाना ऐकताना...!   
      काही लोक पूर्णपणे बिझनेस मॅन वाटतात. कारण त्यांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या बातम्या मला मिळतात, फरक एवढाच की, बिझनेसमेन ही जास्त करून परप्रांतीय असतात ,असे त्यांच्या भाषेवरून मी काढलेला निष्कर्ष आहे ...तो चुकिचाही असु शकतो.   
    जॉगिंग ट्रॅक  जणू काही समाज मनाचा आरसाच असतो. असे अनेक वेगळे विषय जेव्हा आपल्या कानावर पडतात, तेव्हा आपणही यातलं चांगलं काय, वाईट काय याचा विचार करायला लागतो. खरं तर त्यातील काहीअनुभव आपणही अनुभवलेले असतात. एखादी गोष्ट स्वीकारतो ती गुणदोषांसह कशी स्वीकारायला हवी, हे मनाला समजवायला लागतो. आणि मग सर्व कसं  ताजतवानं वाटतं. आपल्या बाबतीत घडलेला एखादा  प्रसंग चांगला किंवा वाईट तो मग आपण  स्वत: बरोबर शेअर करतो आणि हाच ट्रॅक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देत जातो. 
       ट्रॅक जणू काही एक शाळाच वाटायला लागते. शरीराच्या आरोग्याबरोबर मनाचेही आरोग्य सुधारते. माणसं आजमावता येतात. त्यांचे स्वभाव यांचाही अभ्यास सुरू होतो. कोण कसे असेल हे मग आपणच मनाशी संवाद करत असतो. कधी  एखाद्याची शोकांतिका असेल तर तेवढ्या क्षणाला मन  त्या अनोळखी व्यक्तीसाठी हळहळते, कोणाच्या आनंदाच्या गप्पांमधून मनाने त्यांच्यात सहभागी होऊन आनंदही होतो. असे सर्व क्षण वेचत चालत राहायचं असं आपणच आपल्याला बजावत असतो . एवढे मात्र नक्की की, जॉगिंग ट्रॅकवर चा प्रत्येक संवाद आपल्याला एक नवी ऊर्जा देतो आणि आनंदी राहण्यासाठी खूप काही किंमत मोजावी लागत नाही हेही समजतं . चला तर मग, आपण जीवनाच्या ट्रॅकवर सुखदुःखाचे  स्वागत करूया. शेवटी जीवन म्हणजे तरी कायहो,जाँगिंग ट्रॅक की...!!!

पद्मासाहेबराव..।।

1 comment:

  1. वा!या लेखामुळे सगळे जॉगिंग ट्रॅककडे वेगळ्या नजरेने बघतील यात शंका नाही..👌👌

    ReplyDelete