Monday, December 31, 2018

१ जानेवारी २०१९-- नवा दिवस.. नवी आशा !

पहिला दिवस...
   २०१८ लिहिता लिहिता २०१९ लिहावे लागले. थोडी गडबड होते ना...हाताला सवय व्हायलाकाही वेळ जाऊ द्यावा लागेल. आणि ते सवयीचं होता होता परत इतक्यात २०२० लिहावे लागेल..
    काळ किती पटकन सरकतो आहे... नाही का..?
    क्षण निसटून चाललाय... तरीही माणूस वाद-विवाद,हेवेदावे, द्वेष, मत्सर यातच अडकलाय..!
     मरण हे अतिंम सत्य माहीत असुनही अमरत्वाचा कमरपट्टा बांधल्यासारखा फक्त स्वार्थ साधला जातोय....प्रत्येक ठिकाणी..!
   माझं जे आहे ते फक्त माझं आहे..पण तुझंही मलाच हवं, ही लालसा वाढत चालली आहे.
    मुखवट्यांचं जगं जाऊन खरे चेहरे समोर यायला हवे.परत एकदा सत्ययुगाचा अनुभव यायला हवा... कसं असेल ते कल्पनेतलं जगं..,माणसाला माणसांची भिती वाटणार नाही.. वाईट क्रुत्य करण्यासाठी मनात वाईट विचारच येणार नाही..एकमेकांना समजून घेण्यासाठी विश्वासाला खूप महत्व असेल..दिलेली आश्वासन, शब्द पाळली जातील..भ्रष्टाचार, व्यभिचार, खोटेपणा हे शब्द च शब्दकोशातुन हद्दपार होतील.प्रत्येक नाते जपलं जाईल, सावरलं  जाईल, त्याचा आदर केला जाईल.समाजात असणारा प्रत्येक घटक निर्भयपणे जगु शकेल..
   निवडणूक ही उमेदवार च्या पैशापेक्षा सामाजिक बांधिलकी, चारीत्र्य ह्या गोष्टी वर विचार करून घेतली जाईल..गरीब- श्रीमंत ही दरीच नसेल...सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सर्वांना समान संधी असेल..
   असे काही अघटित घडणारच नाही की, आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतील ,किंवा स्रीयावंर ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलने करावी लागतील...! घडेल असं सर्व आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात.?
   माझ्या भारतात प्रांतिक, भाषिक, जातिय व धार्मिक वादच होणार नाहीत.।?
  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीप्रधान अशा माझ्या देशात बळीराजाचा बळी जाणार नाही.. त्याला हया समाज रचनेत उच्च स्थान दिले जाईल...
   जो आज समाजव्यवस्थेत मनोरा दिसतोय तो उलटा दिसायला हवा...!
   ज्या घटकांवर देशाचा कणा ताठ आहे ,ते शेतकरी, कष्टकरी, कामगार,पोलिस, सैनिक, युवा पिढी, विद्यार्थी व उपेक्षित असणारे सर्व जण जेव्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील व ते चित्र स्पष्ट होईल तेव्हा भारतातील जगं हे जगातंही आदर्श असेल.!!
   पण.. हे सर्व कधी होणार.? की कल्पनाच राहील..!
नव्या वर्षाच्या ह्या साध्यासुध्या अपेक्षा करायला काय हरकत आहे.!

   पद्मा साहेबराव....!!!

Thursday, December 27, 2018

नवीन वर्षाचे स्वागत....!

    सरत्या वर्षाने काय दिलं?  काय हिरावलं, असा हिशेब मांडायची वेळ आली. अशा  खूप घटना असतात की, त्या शब्दात जरी माडंता  नाही आल्या तरी, मनात त्यांची बेरीज वजाबाकी चालूच असते. फक्त प्रत्येक क्षणी आपल्या जवळ कागद-पेन नसतो हा त्यात फरक असतो. आणि मग जेव्हा हे कागदावर उतरवायचं ठरवतो तेव्हा बर्‍याच गोष्टी आपण विसरुन गेलेलो असतो.  
    विसरणं, ही जी मनाची अवस्था असते ना, ती मला कधी कधी खूप आधाराची  वाटते. कारण काही असे प्रसंग असतात की त्याने आपण खूप दुखावले जातो. त्यात कोणाला केलेली मदत .. किंवा आधार दिलेला असेल, वेळ निभावून नेली असेल... तर मग ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवत नाही. मग त्या व्यक्तीलाच विसरून जाणं मला फार सोपं वाटतं.
    काही काळासाठी तरी आपण हे सर्व विसरणं खूप सोयीचं असतं. फार त्रासही होत नाही.
आपल्या आयुष्यात जवळच्या व्यक्तींना झालेला त्रास, त्या अडचणीवर केलेली मात मात्र आपल्याला सुखावते.
    येथपर्यंत विसरणं आणि आठवणं, यांचे द्वंद्व सुरू असते. मनाच्या या दोन अवस्था पूर्ण आयुष्य सुंदर करून टाकतात. वाईट गोष्टींना विसरणं ही भावना मनाच्या सोबत नसती तर जीवन जगणं कंटाळवाणं झालं असतं! चांगल्या आठवणी तर आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतात.
    त्या बरोबरच मनाचे असे कप्पे करावेत की त्यात वाईट म्हणुन जो कचरा आहे, तो बाजुला करावा.. जे जे काही उत्तम असेल त्यासाठी मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवावेत.. जेणेकरून सुख वाटता आले पाहिजे.
   म्हणून नवीन वर्षात आपण ठरवू की, चांगलं सारं आठवायचं...वाईट सारे विसरायचं...कडू-गोड घटनां चा स्विकार करायचा...आणि सरत्या वर्षाचे आभार मानायचे...
     
पद्मा साहेबराव...